Saturday, January 24, 2009

आसवे

आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे

लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे

जाहलो मी अता आसवांची कबरमी
मला खोडुनी गाडली आसवेही

गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे

-- वैभव देशमुख

No comments: