प्राणात तुला जपले मी डोळ्यात न येऊ देता
गुणगुणतो गीत तुझे मी ओठात न येऊ देता
रडलो तर रडलो ऐसा कळलेच कुणाला नाही
हसलो तर हसलो हासू गालात न येऊ देता
(यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाटे त्यांना
देवाला पुजता येते हृदयात न येऊ देता)
पाजावे जहर कुणाला हातून तुझ्या पाजावे
शंकेचा गंध जराही जहरात न येऊ देता
भरणार कधी ना ऐशा का झाल्या असत्या जखमा
जर डाव उधळला असता रंगात न येऊ देता
ज्या रातीसाठी केल्या बरबाद हजारो राती
काळाने नेले मजला ती रात न येऊ देता
-- वैभव देशमुख
Saturday, January 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment