Sunday, March 2, 2008

ओळखीचा वाटल्यावर....

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला

एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे,
अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला

तो कधी झाला न माझा, जो कधी नव्हता कुणाचा,
एक होता चेहरा जो आरसे चुकवून गेला

वाटले त्याला, बघावे एकटा जगतो कसा मी
एवढ्यासाठीच मजला तो घरी भेटून गेला

जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला

टाळला मी आरसा तर चेहरा विसरून गेलो
पाहिला, तर सर्व पारा आतला निखळून गेला

आजही सांगू न शकलो त्यास माझी यातना
मी आजही जखमेवरी तो आसवे बरसून गेला

शेवटी अश्रूंत माझ्या चेहरा माझाच दिसला
जो दिलासा भेटला तो आरसा देऊन गेला

तो तुझा नव्हता कुणी तर का तुला मंजूर होता?
तो तुझा होता कुणी तर का तुला जाळून गेला?

प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू
की खुलाशांचाच साय्रा अर्थ मग बदलून गेला

No comments: